President Message

अध्यक्षांचे मनोगत

अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार परिसर तसा समृद्धच. संत महंताच्या वास्तव्याने व पदस्पर्शाने पावन झालेला कर्मयोगी संत गाडगेबाबा यांना अतीप्रिय असलेली नागरवाडी याच परिसरात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनीही आपली पायधूळ इथेच झाडलेली. प्रज्ञाचक्षु संत गुलाबराव महाराजही इथलेच. महानुभवाची काशी रिद्धपूर हाकेच्या अंतरावर. अशा या पावन परिसरात उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन अनेक वर्ष प्राचार्य म्हणून काम करण्याचा योग मला आला. व त्या अनुभवातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख व दर्जेदार शिक्षण देता यावे या हेतूने चांदूरबाजार येथे सन २००८ साली विज्ञान व गृहविज्ञान महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली.सन २०१७-१८ या वर्षात महाविद्यालय एका दशकाची यशस्वी वाटचाल पूर्ण करीत आहे. एका दशकाच्या अल्पकालावधीत या परिसरातील सुज्ञ पालक व विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे हे महाविद्यालय आज बोराळा रोड वरील स्वतःच्या प्रशस्त इमारतीत स्थलांतरित झाले आहे. विज्ञान, गृहविज्ञान, समाजशास्त्र व वाणिज्य विषयाच्या पदवी पर्यंतच्या शिक्षणाची सोय या ठिकाणी करण्यात आली शिवाय इतर अनेक रोजगारभिमुख उपक्रम महाविद्यालयात सातत्याने राबविण्यात येतात व त्या करिता सतत मार्गदर्शन करण्यात येते. विद्यार्थी केद्रबिंदू मानून काम करणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महाविद्यालयाला लाभल्यामुळे विद्यार्थ्यांनाही हे विद्यालय आपलेसे वाटते.या विद्यालयाने अमरावती विद्यापीठाच्या गुणवत्तायादीमध्ये स्थान मिळविण्याचा बहुमानही अनेकांना प्राप्त झालेला आहे. सांस्कृतिक क्षेत्रातहि विद्यार्थ्यांनी नाव कमाविले आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या महाविद्यालयाने लक्षणीय प्रगती केली आहे. श्री दत्त लखमाजी शिक्षण प्रसारक मंडळ अमरावती द्व्यारा संचालित विज्ञान व गृहविज्ञान विद्यालय, चांदूरबाजार हे महाविद्यालय उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात सदैव कार्यरत राहून या परीसरातील शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन आपली पुढील वाटचाल करेल अशी ग्वाही मी पालकांना देतो. मार्च २०१७ च्या १२ वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्याथ्यांचे हार्दिक अभिनंदन, तसेच उच्च शिक्षण क्षेत्रात पदवीसाठी प्रवेश घेणाय्रा विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो.

प्राचार्य रावसाहेब ठाकरे
(अध्यक्ष)